Premium

बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार? १५ ते २० उमेदवार उभे करण्याच्या तयारीत, माध्यमांनी विचारताच म्हणाले…

बच्चू कडू म्हणाले, “सरकारमध्ये असूनही मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय. मी मेल्यावरच शेतकऱ्यांबाबतची माझी भूमिका बदलेल!”

bachchu kadu on maharashtra assembly election
बच्चू कडू यांचं सूचक विधान चर्चेत! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आगामी विधानसभा निवडणुकांसदर्भात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाच्या आमदारांनी आज मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर अजित पवारांनीही विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने बारामतीत येत्या १४ तारखेला होणाऱ्या सभेपासून प्रचाराला सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी आपण मेल्यावरच शेतकरी हिताच्या मुद्द्यांबाबत आपली भूमिका बदलेल, असं ठामपणे त्यांनी सांगितलं. याच मुद्द्यावर सरकारशी चर्चा करणार असून त्यावर सहमती न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराच बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना दिला.

काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल, अशी ठाम भूमिका मांडली आहे. “शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे. पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणून येतात. आमचा १०-१५ आमदारांचा जर एखादा गट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक राहिला, तर त्यासंदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात”, असं म्हणत बच्चू कडूंनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

बच्चू कडू नाखूश?

बच्चू कडू सरकारवर नाखूश असल्याच्या चर्चा रंगत असून त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “नाखूश वगैरेचा विषय नाही. आम्ही मुद्द्यावरच लढू, चर्चा करू. शेतकरी, मजुरांच्या प्रश्नांवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. ते काय सकारात्मकता दाखवतायत ते बघू. जर त्यांच्या सरकारकडून हे नाही झालं तर किमान मी तरी १५-२० ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतंत्र लढणार”, असं ते म्हणाले.

‘तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स करणार का?’, अजित पवारांना प्रश्न विचारताच दिलं सूचक उत्तर; म्हणाले, “आम्हाला जे…”

“मी तिसऱ्या आघाडीचं सध्या बोलणार नाही. मी माझा स्वत:चा निर्णय घेणार. आम्ही स्वत: शेतकरी, कष्टकरी, मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ. पण त्याआधी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. आम्ही मंत्रीपदाची मागणी करणार नाही. जर शेतकरी, दिव्यांगांच्या बाबतीत जर ते निर्णय घेणार असतील, तर आम्ही सोबत राहू”, असंही बच्चू कडूंनी सांगितलं. “आम्ही सध्या वेगळे लढत नाही आहोत. आमच्या १५-२० मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली, निवडणुकीच्या आधी शेतकरी-मजुरांच्या बाजूचे काही निर्णय झाले, तर आम्ही सरकारसोबत राहू. पण ते झालं नाही, तर मग मी स्वतंत्र लढेन”, असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे.

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत?

स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला बच्चू कडूंनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. “रविकांत तुपकर, संभाजी राजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण एकत्र येऊन शेतकरी, शेतमजूरांसाठी लढलं पाहिजे. त्यासंदर्भात आत्तातरी पूर्ण चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachchu kadu hints leaving mahayuti in maharashtra assembly elections 2024 pmw

First published on: 09-07-2024 at 11:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments