शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल, असं सर्वांना वाटत होतं. पण बच्चू कडू यांना अद्याप मंत्रीपद मिळालं नाही. मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत:ही अनेकदा उघड वक्तव्ये केली आहेत.

दरम्यान, बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचं विधान केलं आहे. नवीन सरकारमध्ये मला नक्की मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ते बुलढाणा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा- “असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का?”, मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा RSSला सवाल

यावेळी बच्चू कडू म्हणाले, “आता दुसऱ्यांदा जेव्हा सरकार येईल, तेव्हा बच्चू कडू नक्की मंत्री होईल. मंत्रीपद म्हणजे हाती आलेलं एखादं हत्यार आहे. एखादं शस्त्र आहे. ते शस्त्र हाती नसलं म्हणून माणूस थांबतो का? तर तो अजिबात थांबत नाही. शेवटी लढण्याची जिद्द पाहिजे. सामान्य माणसांसाठी काम करण्याची तुमची इच्छाशक्ती पाहिजे. त्यामुळे मंत्रीपद ही फार मोठी गोष्ट नाही.”

हेही वाचा- “अमित शाह यांच्या भीतीने…”, ‘वज्रमूठ’ सभेवरून आशिष शेलारांचं टीकास्र!

“जनतेनं दिलेली आमदारकी ही मंत्रीपदापेक्षा लाख पटीने चांगली आहे. याला कुणीच थांबवू शकत नाही. तेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. दादा, मला म्हणत होते की, मी आंदोलनातच चांगला दिसतो. मलाही वाटतं की, मी आंदोलनातच चांगला दिसतो. कारण मी आंदोलनातूनच उभा राहिलो आहे. माझ्यावर एकूण ३५० गुन्हे दाखल आहेत,” असंही बच्चू कडू म्हणाले.

Story img Loader