प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे त्यांच्या स्पष्ट स्वभावासाठी प्रचलित आहेत. मुद्दा राजकीय असो किंवा सामाजिक, बच्चू कडूंच्या या स्वभावामुळे त्यांनी केलेली विधानं चर्चेचा विषय ठरतात. मंगळवारी दुपारी विधानसभेत समाजातील वंचित घटकांच्या बाजूचे काही प्रश्न मांडताना बच्चू कडूंनी केलेली टोलेबाजी अशाच प्रकारे सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चर्चेचा विषय ठरली. प्रत्यक्ष भाषण चालू असतानादेखील त्यांना विरोधकांबरोबरच सत्ताधारी बाकांवरूनही दाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका होत असल्याच्या संदर्भात बच्चू कडूंनी मिश्किल टिप्पणी केली. मात्र, त्याचवेळी त्यांनी राज्य सरकारकडून जनतेमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना भेदभाव केला जात असल्याचा दावा करत तो मिटवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

“एक-दोन सोडले, तर सगळे जिल्हाधिकारी…”

“हे विषमतेचं बीज आपण तोडलं पाहिजे. आम्ही कष्ट करायचे आणि जिल्हाधिकारी ३ लाख रुपये महिना घेतो. कोणता जिल्हाधिकारी चांगलं काम करतोय? एक-दोन जिल्हाधिकारी सोडले, तर सगळे जिल्हाधिकारी बसून खातायत”, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार

दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. ओबीसी समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी योजना देण्याचं काम केलं, असं बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे सभागृहात हास्याची लकेर उमटली. “फडणवीसांचे आभार मानतो मी. ओबीसीचे एवढे मंत्री झाले, पण ओबीसींसाठी एकही घरकुल योजना आणली नाही. आजकाल लोक शिव्या देताना आधी मुसलमानांना देतात, मग ब्राह्मणांना आणि उरलं-सुरलं की मराठ्यांना शिव्या देतात. देवेंद्र फडणवीसांचं नाव तर बदनामच केलंय. पण त्यांनी योजना दिली ना. जे चांगलंय त्याला आम्ही चांगलंच म्हणतो”, असं बच्चू कडू यावळी म्हणाले.

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता”, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच…”

आपल्या या टिप्पणीवर लगेच पुढे बच्चू कडूंनी आपण कुणाला कशाला घाबरायचं, असंही नमूद केलं. “जे चांगलंय त्याला आम्ही चांगलं म्हणतो. आम्ही का घाबरायचं? आम्ही काय तिकीट मागायला येतो का तुमच्या पक्षाकडे? काहीच गरज नाही. आमची पर्मनंट तिकीट आहे. मागे बसलेले काही आमदार मला म्हणाले की तुम्ही असंच बोलत जा. आम्हाला ते बोलता येत नाही. मी म्हटलं मला सांगत जा, तुम्हाला जे बोलता येत नाही, ते मी बोलत जाईन”, असं बच्चू कडू म्हणाले. त्यावर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu light moment in assembly session mocks devendra fadnavis pmw