सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (११ मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील महिन्याभरापासून राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे ठरवले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली असंही म्हटलं. राज्यपालांचे अनेक निर्णय चुकीचे होते. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला.
न्यायालयाने राज्यपालांचे निर्णय चुकल्याचं म्हटलं आहे, तसेच अनेकांच्या चुकांमुळे हे सरकार पडलं. मात्र उद्धव ठाकरेंचं सरकार पुनर्स्थापित करता येत नाही, असंही कोर्टाने सांगितलं. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार कायम आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आणि भाजपाच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. खरंतर सरकाविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हे सरकार स्थिर नाही, हे सरकार कधीही कोसळेल असं बोललं जात होतं. त्यामुळे या सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार केला गेला नाही. परंतु आता हे सरकार स्थिर असेल त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जाऊ लागलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट गुरुवारी संध्याकाळी म्हणाले, आता पूर्ण मंत्रिमंडळ बनणार आहे. एकूण २० आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वांना संधी दिली जाईल. मुळात स्वतः आमदार संजय शिरसाटही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज (१२ मे) टीव्ही ९ मराठीने प्रहार जनशक्ती पक्षाचे (भाजपा – शिंदे गटाचा मित्रपक्ष) आमदार बच्चू कडू यांना याबाबतप्रश्न विचारल्यावर आमदार बच्चू कडू म्हणाले, येत्या २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एकंदरीत ज्या काही वार्ता कानावर येत आहेत त्यावरून मी हे सांगतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल.
हे ही वाचा >> परभणी : शौचालयाचा टँक साफ करताना पाच सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू
दरम्यान, तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार का असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, मी मंत्रिमंडळात कधी येईन हे सांगता येत नाही. परंतु दिलेला शब्द पाळणार हे मात्र निश्चित आहे.