राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. एकीकडे शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवार गटाविरोधात तक्रार केली असून दुसरीकडे अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकी शरद पवारां व त्यांच्या गटाची काय भूमिका आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळातून या विधानावर प्रतिक्रिया उमटत असताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पुण्यात बोलताना पक्षात फूट पडली नसल्याचं विधान केलं. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्याला फूट म्हणता येणार नाही”, असं त्या म्हणाल्या. या विधानाचं शरद पवारांनी समर्थन केलं. “अजित पवार पक्षाचे नेते असून त्यावर कोणताच वाद नाही. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत”
दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढंच मी सांगेन”, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.
“एकीकडे ते म्हणतात फूट नाही, दुसरीकडे ते नोटीस देतात. हा सगळा मोठा खेळ आहे. हा मोठा गेम असू शकतो. एकतर आघाडीत राहून शरद पवार लढतील आणि युतीत राहून अजित पवार लढतील. नंतर दोन्ही नद्यांचा संगम होऊन पुन्हा आपलाच एक सागर तयार करू शकतील”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
“हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, अशी खोचक टिप्पणी बच्चू कडूंनी यावेळी केली.