एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. शिंदे गटातील आमदारांनी गद्दारी केली, त्यांनी प्रत्येकी ५० खोके घेतले, असा आरोप मविआच्या नेत्यांनी केला. या सर्व घडामोडींवर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणातील सगळेच नेते गद्दार आहेत. अजित पवार गटातील लोक आम्हाला ‘खोके-खोके’ म्हणायचे आता तेच सत्तेत सहभागी झाले आहेत, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं. तसेच सत्तेच्या राजकारणात अशा गोष्टी सहज घडत असतात, लोकांनीही अशा गोष्टी मनावर घेतल्या नाही पाहिजे, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- एकनाथ खडसेंना हृदयविकाराची समस्या, प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट समोर

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही त्यांना पाठिंबा दिला होता. तेही सुरतला गेले होते. त्यावेळी बच्चू कडू म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर गद्दारी केली होती, ती चूक आम्ही दुरुस्त करत आहोत. याबाबत विचारलं असता बच्चू कडूंनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर गद्दारी केली, असं मी म्हटलंच नाही. मी असं कसं काय म्हणू शकतो? कारण मी स्वत: भाजपाच्या विरोधातच निवडून आलो आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही. उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर एकत्रित निवडणूक लढले होते. मग ते सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा माझा प्रश्न आहे.”

हेही वाचा- “भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?”, बच्चू कडूंचा रोखठोक सवाल

उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आणि आम्हीही तेच केलं तर काय चुकलं? असं तुम्हाला म्हणायचं होतं का? असं विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “सगळे राजकीय नेते गद्दारच आहेत. नाना पटोले पूर्वी भाजपात होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. मग तुम्ही कुणाला गद्दार म्हणणार? अजित पवार आणि त्यांचा गट आम्हाला ‘खोके खोके’ म्हणायचे, आज तेच सत्तेत सहभागी झाले. हे राजकारण आहे. प्रत्येकजण सत्तेचं राजकारण करत आहे. सत्तेच्या राजकारणात अशा गोष्टी सहज घडत असतात. लोकांनीही अशा गोष्टी मनावर घेतल्या नाही पाहिजे. सत्ता कुणाचीही असली तरी ती माझ्या कामाची आहे का? जनतेला याचा फायदा होतोय का? एवढी मानसिकता लोकांनी ठेवली पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu on ajit pawar faction and uddhav thackeray khoke and gaddar allegations rmm
Show comments