Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सध्या सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. महायुतीच्या सरकारबाबत दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिनही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला कसा असेल? यावर चर्चा होणार आहे.
तसेच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केली. त्यामळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीही महायुतीच्या नेत्यांची उद्याची दिल्लीतील बैठक महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र, अशातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. “जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ‘माय पार्टी अँड माय फादर’ म्हणत पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय?
बच्चू कडू काय म्हणाले?
“गरज सरो वैद्य मरो, असा अजेंडा भारतीय जनता पक्षाने वापरू नये. जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता. तसेच आजचं चित्र वेगळं राहिलं असतं. त्यामुळे ही जी किमया आहे ती किमया एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असं करेल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदासंदर्भातील दावेदारी योग्य आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदावरून माघार
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरील त्यांचा दावा सोडला आहे. त्यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यात महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली पाहून शिंदे यांनी माघार घेतली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपा व त्यांचं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबाबात व नव्या सरकारबाबत जो काही निर्णय घेईल तो निर्णय मला व शिवसेनेला मान्य असेल”. तसेच शिंदे यांना यावेळी विचारण्यात आलं की नव्या सरकारमध्ये तुमची भूमिका काय असेल? त्यावर शिंदे म्हणाले, “उद्या दिल्लीत आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल. त्या चर्चेत माझी महायुतीच्या सरकारमधील भूमिका ठरेल”.