भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. त्यासाठी भाजपाच्या कार्यकारिणीच्या अनेक बैठका पार पडत आहेत. दरम्यान, लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असंही बोललं जात आहे. या घडामोडी सुरू असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे.
एकाच व्यक्तीकडे आठ-आठ खाती असतील तर जनतेची सेवा करण्यात बाधा निर्माण होते, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. कुणाचंही नाव न घेता त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरं तर, देवेंद्र फडणवीस हे सहा विभागाचे मंत्री आणि सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीही आहेत, यावरूनच बच्चू कडूंच्या बोलण्याचा रोख फडणवीसांकडे होता, अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा- विधानसभेत २०० हून अधिक जागांचा भाजप-शिवसेनेचा ‘महासंकल्प’
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यकच आहे. कुणी नाराज होईल, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार थांबवला जात असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी सरकार हे जनतेच्या सेवेसाठी असतं. एखादा नेता आठ-आठ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असेल किंवा एकाच व्यक्तीकडे आठ खाती असतील तर निश्चितच सेवेला बाधा निर्माण होते. त्यामुळे याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार केल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
“लगेच आम्हालाच पद द्या, असं आम्ही म्हणत नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरात लवकर करा. प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री द्यावा, अशी विनंती करतो,” असंही बच्चू कडू पुढे म्हणाले.