मागील अनेक दिवसांपासून लांबवणीवर असलेलं राज्यमंत्रीमंडळाचं खातेवाटप झालं आहे. यामध्ये अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळाली आहेत. अजित पवारांकडे अर्थखातं देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदार विरोध करत होते. असं असूनही अजित पवारांकडे अर्थखातं देण्यात आलं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील काही आमदार नाराज झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव आणला आणि यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उशिरा आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं आहे, असं एकंदरीत दिसतंय. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालंय, ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाब आणला आणि ते यशस्वी झाले, असं एकंदरीत दिसतंय.”
हेही वाचा- “मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होतोय”, अजित पवारांकडून स्तुतीसुमने
अजित पवारांना अर्थ खातं देण्याबाबत विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “अजित पवारांना अर्थखाते मिळू नये, असं सर्वांचं मत होतं. कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ९० लाखांचा निधी देण्यात येत होता. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते अजित पवारांवर नजर ठेवतील, असं वाटतंय.”
हेही वाचा- “वाटेल ती किंमत मोजू पण… “, सत्ताधाऱ्यांचा उल्लेख करत रोहित पवारांचा थेट इशारा
आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “मागील पाच वर्षांचा कालखंड पाहिला, तर नाहीही म्हणू शकत नाही. आणि हो सुद्धा म्हणू शकत नाही. कारण, अंदाज लावण्याच्या पलीकडे राजकारण सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या घटना यापूर्वी कधीच पाहिल्या नाहीत.”