राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी मित्रपक्षांपैकी कुणाला मंत्रीपदं मिळणार? याची मोठी चर्चा पाहायला मिळाली. त्यातही या नव्या आघाडीला पाठिंबा देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तर उघडपणे मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. तसेच, सामाजिक न्याय विभागाचं मंत्रीपद मिळावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटूनही बच्चू कडूंना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार की नाही? आणि मिळालं, तर नेमकं कधी मिळणार? यावरून राजकीय तर्क-वितर्क सध्या सुरू आहेत. त्यावर आता खुद्द बच्चू कडूंनीच मोठं विधान केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील अतीवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली मदत यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा दावा माध्यम प्रतिनिधींनी करताच बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “तुम्ही पाहात नसाल, तर माझ्यासोबत चला. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दाखवतो. दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
मंत्रीपद नेमकं कधी मिळणार?
बच्चू कडू यांनी नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेकदा माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाविषयी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे, नेमकं मंत्रीपद मिळणार कधी? याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. “यावर बोलायला मी काय प्रमुख आहे का?” असा मिश्किल सवाल बच्चू कडूंनी केला.
“शिंदेंचा गट, भाजपाचा गट यामध्ये आमच्या दोघांचा लहानसा प्रहार आहे. आम्हाला काय आता? मी तर मागेही म्हणालो होतो. आता नाही तर अडीच वर्षांनंतर मंत्रीपद मिळेल”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.