Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. बहुमतानंतर राज्यात महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस होऊन गेले तरीही सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. एवढंच नाही तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या सरकारबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं. तसेच याच बैठकीत राज्याचा मुख्यमंत्री देखील ठरल्याचं बोललं जातं. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सस्पेंस कायम आहे.
तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे गृहखातं मागितलं असल्याची चर्चा आहे. पण गृहखातं शिवसेनेला देण्यास भाजपाचा विरोध आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच ते दोन दिवस दरेगावी गेले होते. त्यामुळे महायुतीत नेमकी काय चाललंय? यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता माजी आमदार बच्चू कडू यांनी या सर्व घडामोडींवर मोठं भाष्य केलं आहे. “भारतीय जनता पक्षाकडून तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, हे मी एकनाथ शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांची भाजपाकडून कोंडी होत आहे का? याबाबत आता अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत.
बच्चू कडू काय म्हणाले?
“मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं, बऱ्याचवेळा सांगितलं की, भारतीय जनता पक्षाकडून तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. कारण एकनाथ शिंदे हे एकमात्र मुख्यमंत्री असे होते की रात्री दोन वाजता देखील सर्वसामान्य माणसांना भेटायचे. असा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कधीकाळी असं वाटलं होतं की एकनाथ शिंदेंना आपण थोडं दाबून ठेवू. मात्र, ते सत्तेत असताना त्यांना दाबून ठेवू शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांचं काम बोलत होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार होता. कारण भाजपाला एकहाती सत्ता घ्यायची आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.