Bachchu Kadu On Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले. या घटनेत वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. यातच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातो. यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. यातच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो समोर आले आणि राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी यांनी आज (४ मार्च) राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रहारचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं विधान केलं आहे. “धनंजय मुंडेंनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू काय म्हणाले?

“खरं तर धनंजय मुंडे यांनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, तर या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं? अशा प्रवृत्ती देशभरात आणि राज्यभरात कशा पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत. पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्ता आणि पक्ष यामधून सत्ता एवढंच शिल्लक राहिलं का? हातात तलवारी घ्या, अत्याचार करा, पण सत्ता आमच्या हाती द्या. असा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध केला पाहिजे. मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता? हा विषय महत्वाचा नाही, तर ज्या प्रवृत्तीने मारलं, ज्या पद्धतीने मारलं, आरोपींनी ज्या प्रकारे क्रूरपणा केला हे फार वाईट आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

“ही प्रवृत्ती एकाएकी तयार होत नाही. पण ही प्रवृत्ती तयार झालेली आहे. आधी १० ते २० वर्ष या प्रवृत्तीला खतपाणी घातलं गेलं. वाल्मिक कराड सारखा क्रूर दादा येथे तयार होतो आणि त्याला राजाश्रय मिळतो हे दुर्देव आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देताना संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचा साधा निषेध देखील केला नाही. मी आजारपणामुळे राजीनामा देतो असं म्हटलं, म्हणजे ही काय प्रवृत्ती आहे? किती लहानपण आपण लोकांना दाखवत आहात? आपण आमदार आहात, मोठेपण घेता आला पाहिजे. लोकांच्या भावना जोडता आल्या पाहिजेत. पण असं धनंजय मुंडेंनी काहीही केलं नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.