आगामी विधानसभेची निवडणूक पाहता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांचे नेते सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यातच तिसऱ्या आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. असे असतानाच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. “आमच्या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही निर्णय घेणार आहोत”, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज पत्रकार परिषद घेण्याच कारण की ९ ऑगस्ट रोजी आम्ही शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. ९ ऑगस्ट रोजी आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदन देणार आहोत. त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहोत. आमच्या मागण्यांवर जर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार आहोत”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
“आपल्या देशात जास्त कष्ट करणाऱ्या लोकांवरच जास्त अन्याय होतो. आज शहर आणि ग्रामीण अशा प्रकारची विषमता वाढत चालली आहे. मुंबईत आजही हजारो लोक फुटपातवर झोपतात. असे विषमतेचे अनेक विषय सांगता येतील. अशा प्रकारच्या अनेक गोष्टीचं उत्तर आम्ही ९ तारखेच्या मोर्चामध्ये सरकारकडे मागणार आहोत”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
…म्हणून हा आंदोलनाचा विषय
बच्चू कडू पुढे म्हणाले, “आगामी विधानसभेची निवडणूक आली म्हणून हा आंदोलनाचा विषय नाही तर निवडणुकीमध्ये आम्ही जे विषय मांडत आहोत, ते विषय समोर आले पाहिजेत. आम्ही हे आंदोलन निवडणुकीसाठी करत आहोत असं समजा. मात्र, जातीधर्माचे प्रश्न नाही तर सर्व जातीमधील गरीबांचे प्रश्न या निवडणुकीचे मुद्दे झाले पाहिजेत. ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं अशी सवय आम्हाला नाही. तसं आम्ही कधी करणारही नाही. निवडणुकीत गरीबांचे प्रश्न का होत नाहीत?,” असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
ते पुढं म्हणाले, “कंपनीत काम करणाऱ्यांच्या बाजूने कायदा नाही. कामगारांचे कष्ट कुठे मोजले जातात? या देशात कष्ट मोजण्याची व्यवस्थाच नाही. अनेक योजना आहेत पण व्याधी पाहून योजनांचा लाभ द्यायला हवा. ज्यांना दोन पाय नाहीत, हात नाहीत, अशांना मिळायला पाहिजेत. या सर्व गोष्टीवर चिंतन होण्याची गरज आहे”, असंही बच्चू कडू म्हणाले.
…तर निवडणूक लढणार नाही
“राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्यांचा शासन निर्णय काढला तर तर मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार नाही. माझी जागा मी भारतीय जतना पक्षाला किंवा शिवसेनेला देईल. पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग तेच मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार नाही. तसेच तिसरी किंवा दुसरी आघाडी आम्ही मानत नाही. आमची शेतकरी आणि शेतमजूरांची आघाडी राहिल”, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं.