मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर बच्चू कडू आनंदी झाले. याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, राज्यात स्वतंत्र ‘दिव्यांग मंत्रालय’ला मंजुरी देण्यात आली आहे. हे देशातील अशा प्रकारचं पहिलंच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केलं पाहिजे? असा एक मोठा संदेश देशात गेला आहे. आम्ही नेहमी म्हणायचो की, अर्थसंकल्पाचं पहिलं पान ज्यादिवशी दिव्यांगासाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी, मजुरांसाठी आणि वंचितासाठी लिहिला जाईल, तेव्हा देशाचं बजेट सर्वात सुंदर असेल. असा अर्थसंकल्प देशाला सक्षम करणारा असेल.
हेही वाचा- मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“मला वाटतं की, मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरून गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरू झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच असेल” असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- “…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
मंत्रिपद मिळणार असल्याने तुम्ही आनंदी आहात का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिपद वगैरे चुलीत घाला. तुम्ही शेवटी त्याच मुद्द्यावर येता. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्त्वाचं नाही. मंत्री तर मी होणारचं आहे. कारण एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आहे. पण आधी सेवा करू. दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत सेवा देऊ. हे मंत्रालय केवळ मंत्रालयापुरतं मर्यादीत राहणार नाही. दिव्यांगाच्या उंबरठ्यावर जाऊन त्याला सेवा देण्याचं काम आम्ही करणार आहोत” असंही कडू म्हणाले.