अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी खोके घेतले, असा आरोप रवी राणांनी केला होता. यानंतर दोघांमधील संघर्षाला तोंड फुटलं आहे. आता हा वाद शिगेला पोहोचला असून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी रवी राणांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
“रवी राणा हा एकीकडे आम्हाला बदनाम करतो आणि दुसरीकडे मंत्रिपदाच्या रांगेत उभं राहतो. त्याच्यात लाज-लज्जा उरली नाही. ज्याच्या घरी जेवण करायचं, त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं, असा हा प्रकार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा– “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा, पाहा VIDEO
रवी राणांसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “रवी राणांनी जे आरोप केले आहेत. ते एकट्या बच्चू कडूंवर केले नाहीत. त्यांनी सर्व आमदारांवर आरोप केले आहेत, असं मला वाटतं. मी जर पैसे घेतले असतील तर मला पैसे कुणी दिले? हा मूळ प्रश्न आहे. याचं उत्तर रवी राणांनी दिलं पाहिजे. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी खोके घेतले आहेत, असा आरोप करताना रवी राणांनी काही विचारच केला नाही.”
हेही वाचा- “…या लोकांना मी सोडणार नाही” शिंदे-फडणवीसांच्या आदेशाचं पालन करणार म्हणत रवी राणांचा इशारा!
‘मी खोके घेतले आहेत’ असा आरोप करून रवी राणा आम्हाला बदनाम करत आहेत. दुसरीकडे, ते मंत्रिपदाच्या रांगेत कसं काय उभं राहतात? त्यांना आता लाज, लज्जा उरली नाही. मंत्रिपदासाठी रांगेतही थांबायचं आणि आम्हाला बदनामही करायचं, असं रवी राणा करत आहेत. म्हणजे ज्याच्या घरी जेवण करायचं, त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं, असा हा प्रकार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. बच्चू कडू हा मंत्रिपदाचा चोमड्या नाही. अशी मंत्रिपदं आम्ही ओवाळून टाकतो. जेव्हा मैदानात उतरायचं असेल तेव्हा आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरेन, अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे.