भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. “सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला होता.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या इंग्लंड दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ५०-६० लाख रुपये खर्च करून सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला गेले आणि मोकळ्या हाताने परतले, ही बाब मला आवडली नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

हेही वाचा- “…पण गिरीश महाजनांना नेहमी मोठी खाती मिळतात”, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत

सुधीर मुनगंटीवार यांच्या इंग्लंड दौऱ्यावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार हे वाघनखं न घेताच परत येत आहेत. ते ५०-६० लाख रुपये खर्च करून तिथे गेले. हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत.”

हेही वाचा- “साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका

“सुधीर मुनगंटीवार यांनी जाण्या-येण्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च करावा, हे मला काही आवडलं नाही. त्यांनी वाघनखं आणली असती, तर चांगली गोष्ट होती. दोन-तीन वर्षांसाठी वाघनखं उसणे आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे. मला वाटतंय आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखं लुटूनच आणू”, असंही बच्चू कडू म्हणाले.

Story img Loader