Bachchu Kadu On Uddhav Thackeray and Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या अपयशाला समोरं जावं लागलं. विधानसभेला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असतानाच आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. बच्चू कडू यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत त्यांचं हे विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपाबरोबर अडकून राहिले आहेत. मात्र, त्या दोन ते तीन विधेयकांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे. त्यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता टाळता येत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीबरोबर आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बच्चू कडू यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर विचारला असता बच्चू कडू यांनी म्हटलं की, “गरज सरो वैद्य मरो”, अशा मोजक्या शब्दांत बच्चू कडू यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
आशिष शेलार काय म्हणाले?
बच्चू कडू यांच्या विधानावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत. मात्र, त्याचं हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचं आडनाव कडू आहे गोड नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं हास्यास्पद विधान करू नये”, असं म्हणत आशिष शेलार यांनी बच्चू कडू यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं.