भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याची माहिती दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं आहे. या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत.
यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेच्या वक्तव्याबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “पंकजा मुंडेंचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता. त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं”
हेही वाचा- “लोकांनी बागेश्वरपासून…”, फडणवीस-धीरेंद्र शास्त्रींच्या भेटीवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा?”