३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. बच्चू कडूंनी आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याने आपण पाचही मतदारसंघात उमेदार उभे केले आहेत, अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष विरुद्ध भाजपा व शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच नव्हे तर आगामी ३० जानेवारी रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये पाचही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे, अमरावतीतून किरण चौधरी, कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा, नागपुरातून अतुल रायकर तर नाशिकमधून अॅड. सुभाष झगडे असे पाच उमेदवार निवडणुकीत उभा राहणार आहेत. यातील एक ते दोन जागा आम्ही कुठल्याही परिस्थित जिंकू…,” असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल
बच्चू कडू पुढे म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याबाबतची सगळी कल्पना मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. या निवडणुकांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मेहनत करतोय. तीन ठिकाणी आम्ही प्रचंड मतनोंदणी केली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विचारात घेऊन उमेदवार उभा करावा. शिंदे गट, प्रहार आणि भाजपा अशी युती करून उमेदवार द्यावेत, अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे आम्ही पाचही ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.