शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडले नसते तर चकमक घडवून त्यांची हत्या केली असती, असा गौप्यस्फोट संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून संबंधित वक्तव्यात तथ्य असेल सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, संजय गायकवाड यांना माहिती कशी प्राप्त झाली? हे मला माहीत नाही. पण त्या माहितीत तथ्य असेल, तर ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. जर अशापद्धतीने राजकारण व्हायला लागलं, तर चुकीचं आहे. त्यांच्या माहितीत तथ्य असेल तर पोलीस यंत्रणेकडून तपास व्हायला हवा.
हेही वाचा- “…एकनाथ शिंदेंचं ‘एन्काऊंटर’ केलं जाणार होतं”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंना ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली, या संजय गायकवाड यांच्या दाव्यावर बच्चू कडू पुढे म्हणाले, “कार्यकर्ता आणि नेता यांच्यामध्ये जीवाभावाचं नातं असतं. हे नातं खऱ्या अर्थाने कायम ठेवणं, दोघांची गरज असते. पण हे असं होत असेल तर ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे.”
हेही वाचा- सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंना दिली मदतीची हाक; म्हणाल्या, “भाजपाला जमत नसेल तर मी…”
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हत्येच्या कटाबाबत गौप्यस्फोट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.”