अमरावतीत भाजपाच्या दोन मित्रपक्षांमध्ये संघर्ष चालू आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा विरुद्ध प्रहार जनशक्ती पार्टी असा वाद चालू आहे. प्रभावक्षेत्र वाढावं यासाठी बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य अशी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर अमरावतीतून उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. परंतु, बच्चू कडू यांचा त्यास विरोध आहे. तसेच लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत प्रहारला राज्यात जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी आमदार कडू प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आत्ताच विधानसभेचं चित्र स्पष्ट व्हावं ही बच्चू कडू यांची मागणी आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. रविवारी (१४ जानेवारी) अमरावती लोकसभेसंदर्भात भाजपाने बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपाने सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावलं आहे. परंतु, बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभेविषयी चर्चा करण्यासाठी भाजपाने मुंबईत बोलावलेल्या बैठकीलाही बच्चू कडू गैरहजर होते. याबाबत टीव्ही ९ मराठीने बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली. यावेळी बच्चू कडू म्हणाले, आम्हाला (प्रहार जनशक्ती पार्टी) या बैठकीचं निमंत्रण आहे. परंतु, आम्ही या बैठकीला जाणार नाही. आम्ही मुद्दाम जाणार नाही. कारण, लोकसभेविषयी सध्या तरी आमची भूमिका तटस्थ आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्हाला संपूर्ण राज्यभरातल्या जिल्हाप्रमुखांचे फोन येत आहेत. आम्ही नेहमीच युतीसाठी प्रयत्न केला आहे. परंतु, माझा मतदारसंघ (अचलपूर) आणि राजकुमार पटेल यांचा मतदारसंघ (मेळघाट) सोडला तर बाकी राज्यात दोन नगरपंचायती प्रहारकडे आहेत. परंतु, तिथे निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आता विधानसभेबाबत ते (भाजपा) काय निर्णय घेणार आहेत ही गोष्ट आधी स्पष्ट व्हायला हवी. कशा पद्धतीने तुम्ही चर्चेला बसणार याचा निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी बैठक घेतली पाहिजे. त्यानंतर आम्ही युतीच्या कामाला लागू.
हे ही वाचा >> मिलिंद देवरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व तुमच्याशी…”
आमदार बच्चू कडू म्हणाले, भाजपाचं लोकसभा निवडणुकीवर लक्ष आहे. केवळ लोकसभेवर चर्चा केली जात आहे. परंतु, भाजपाला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभेचा विचार करावा. परंतु, आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील. आम्ही तटस्थ आहोत म्हणजे वाट पाहू, बैठक करू, त्यातून काही निर्णय झाला नाही तर गेम करू.