अजित पवार यांनी रविवारी (२ जुलै) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आपल्याच बरोबर आहे असंही त्यांनी सांगितलं. अजित पवारच नाही तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीदेखील भाष्य केलं आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपाने महायुतीतल्या मित्रपक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं. भाजपाने विश्वासात घेतलं नाही याचं आम्हाला दुःख आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जातंय, त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, नाराजीचा सूर असला तरी तो दाखवता येत नाही. आपलेच ओठ, आपलेच दात आणि आपलीच जीभ आहे. आता कोणासमोर बोंबलावं अशी स्थिती आहे. आता काढला ना रस्ता, आता त्या रस्त्यावर काटे आहेत, वाटेत धरणं आहेत त्याला काही अर्थ नाही. त्या नाराजीला काही अर्थ नाही.
हे ही वाचा >> “शरद पवारांच्या परस्पर काहीजण…”, अजित पवार गटाचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
“ओके होऊन आमच्या सरकारमध्ये आले”
बच्चू कडू यांनी याआधीही अजित पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली होती. बच्चू कडू मंगळवारी (४ जून) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, खोके सरकार असं म्हणून आम्हाला जे डिवचत होते तेच आता ओके झाले आहेत. काल आणि परवापर्यंत खोके म्हणणारे ओके होऊन आमच्या सरकारमध्ये आले आहेत. चला जे झालं ते चांगलं झालं”