अचलपूरचे आमदार बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्रातल्या या आमदाराची सध्या दिल्ली आणि आसाममध्ये चर्चा सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे थेट आसामच्या विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला आहे. तसेच आसाममधील विरोधी पक्षांच्या आमदारांनी बच्चू कडू यांच्या अटकेची मागणीदेखील केली आहे. बच्चू कडू यांनी ‘श्वानां’वरून केलेल्या वक्तव्याचा आसाममधील आमदारांनी निषेध नोंदवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आसामबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कडू म्हणाले होते की, “महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली.”

दरम्यान, कडू यांच्या या वक्तव्यामुळे आसामच्या विधानसभेतील वातावरण तापलं आहे. आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “आसामबद्दल इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विरोधी पक्षातील आमदारांनी कडू यांना अटक करावी, अशी मागणी देखील केली आहे.

हे ही वाचा >> सोनिया गांधींचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला अटक; पोलीस म्हणाले, “आरोपीने…”

बच्चू कडू यांचा माफीनामा

दरम्यान, यावर कडू यांनी स्पष्टीकरणदेखील दिलं आहे. कडू म्हणाले की, “मला आसाम नव्हे तर नागालँडचं नाव घ्यायचं होतं. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu says send dogs to assam assembly gets angry demand for action asc