राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पक्षात सर्वात मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांवर जाहीर टीकाही केली. पण नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शरद पवारांना भाजपाकडून केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर आल्याचेही दावे करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत सूचक विधान केलं आहे.
नेमकं काय घडतंय?
शरद पवार व अजित पवार यांची पुण्यात एका व्यावसायिकाच्या घरी भेट झाल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवारांनी या भेटीदरम्यान शरद पवारांना सरकारमध्ये सामील होण्याच्या बदल्यात केंद्रात मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा रंगली आहे. खुद्द शरद पवारांनी या सर्व चर्चा फेटाळल्या असून आपण विरोधकांबरोबरच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. तसेच, अजित पवारांकडून ऑफर आल्याचा मुद्दाही राष्ट्रवादीकडून फेटाळण्यात आला आहे.
शरद पवारांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही ९ शी बोलताना सध्याच्या राजकीय संभ्रमावस्थेवर भाष्य केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनरचं निमंत्रण का आलं नाही? यावरही त्यांनी भूमिका मांडली आहे.
“…म्हणून ते शरद पवार आहेत”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “८३ वर्षांचा माणूस…!”
“मला निमंत्रण आलेलं नाही. पण त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच बोलवलं आहे. मी कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे बोलवलं नसेल. मंत्र्याचा दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात फरक आहे. सरकारमध्ये कुणी हलक्या डोक्याचं नाहीये. सगळे मजबूत विचारांचे लोक आहेत. त्यामुळे मी मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केल्यामुळे कुणी नाराज होऊन मला डिनरला बोलवलं नसेल असं वाटत नाही. मीही काही ती बाब मनाला लावून घेत नाहीये”, असं बच्चू कडू म्हणाले.
“छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रीपद नको”
दरम्यान, आधी मंत्रीपद न मिळाल्याबाबत व मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या बच्चू कडूंनी आता मंत्रीपदाला स्पष्ट नकार दिला आहे. “मुख्यमंत्र्यांचा मला कालच फोन आला होता. काय बोलणं झालं तो विषय जाहीरपणे न सांगता येण्यासारखा आहे. पण आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही. झालंच तर आम्ही राजकुमारला मंत्री करू”, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“भाजपाला वाटतंय हे करून त्यांनी राष्ट्रवादीचा गेम केला, पण..”
“समुद्रातला तळ मोजला जाईल, पण शरद पवारांच्या डोक्यात काय चालू आहे, ते मोजणं शक्य नाही. असं होऊ शकतं की भाजपानं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल. पण उलटंही होऊ शकतं. शरद पवारही भाजपाचा गेम करतील की काय अशा संभ्रमात ही अवस्था आहे”, असं सूचक विधान यावेळी बच्चू कडूंनी केलं आहे.