चिंचवड येथे दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (२२ ऑगस्ट) या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमापूर्वी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडू यांना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेलं ४० टक्के शुल्क आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर बच्चू कडू म्हणाले, हे सरकार नामर्दासारखं वागतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार बच्चू कडू म्हणाले, फक्त सरकार टिकावं म्हणून ग्राहकांचा आणि कांदा खाणाऱ्यांचा विचार केला. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांचा विचार का करत नाही? मी एनडीएमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा शेतमालाचा भाव वाढतो तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही?

बच्चू कडू म्हणाले, मुळात या सरकारला निर्यात शुल्क लावण्याची काहीच गरज नव्हती. हे सरकार ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था आज करून ठेवतंय, एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडलं होतं म्हणून. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेक इन इंडिया, मेड इन इंडिया असं धोरण आहे. मग शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदाइतका भाव मिळेल ना. या सरकारने आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मग आम्ही एकही जागा न मागता पूर्ण ताकदीने एनडीएला पाठिंबा देऊ, पायात चप्पल न घालता फिरू.

दरम्यान, कांद्याचा विषय अधिक गंभीर झाल्याने आपण सरकाविरोधात आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांनाही सुनावलं. बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे किंवा शेतमालाचे भाव वाढल्यावर मीडिया त्याच्या बातम्या दाखवते, मग भाव कमी झाल्यावर का दाखवत नाही.

हे ही वाचा >> कांदा प्रश्नावर मुंडे दिल्लीत, तर फडणवीसांचा जपानहून फोन; महायुतीत श्रेयवादाची लढाई? अजित पवार म्हणाले…

आमदार बच्चू कडू म्हणाले, कधीकधी हे सरकार नामर्दासारखं वागतं. ही सरकारची नामर्दानगी आहे. सत्ता टिकावी म्हणून सरकारने केवळ ग्राहकांचा विचार केला. सरकारने खाणाऱ्यांचा विचार केला पण हे सरकार पिकवणाऱ्याचा विचार का करत नाही? सरकारने ही नालायक प्रवृत्ती सुधारली पाहिजे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu says will support nda if they have clear stand on import export policy asc
Show comments