केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातील ४० टक्के शुल्क लागू केल्यामुळे राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. भाजपा सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातले भाजपाचे मित्रपक्ष उघड भूमिका घेत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केंद्र सरकारकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. तर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी कांदा प्रश्नावर मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते केंद्र सरकारवरही बोलले. “ज्याला कांदा परवडत नसेल तर त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं?” असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला होता. त्यावर बच्चू कडू म्हणाले, कांदा नसेल तर माझ्याकडे लसूण आहे. आमच्याकडे कांद्याच्या ताकदीचाच लसूण आहे. कांदा खरेदी करणं तुमच्या जीवावर येत असेल तर माझ्याकडे मुळासुद्धा आहे. यासाठी इतकी बोंबाबोंब करायची काय गरज आहे?

आमदार बच्चू कडू म्हणाले, कधीकधी हे सरकार नामर्दासारखं वागतं. ही नामर्दानगी आहे. केवळ सत्ता टिकावी म्हणून सरकारने फक्त ग्राहकांचा विचार केला. सरकारने खाणाऱ्यांचा विचार केला पण हे सरकार पिकवणाऱ्याचा विचार का करत नाही? सरकारने ही नालायक प्रवृत्ती सुधारली पाहिजे. मी जरी या सरकारमध्ये, सत्तेत, एनडीएत असलो तरी शेतकऱ्याच्या बाजूने हे वक्तव्य मला करावंच लागेल.

हे ही वाचा >> कांदा प्रश्नावर मुंडे दिल्लीत, तर फडणवीसांचा जपानहून फोन; महायुतीत श्रेयवादाची लढाई? अजित पवार म्हणाले…

आमदार बच्चू कडू म्हणाले, शेतमालाचा भाव वाढल्यावर तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव पडल्यावर का करत नाही? मागे कांद्याला क्विंटलमागे २० रुपये दिले जात होते, क्विंटलमागे शेतकऱ्याचं १,००० रुपयांचं नुकसान होत होतं. कांदा खाल्ला नाही म्हणून लोक काही मरत नाहीत. आतापर्यंत मेलंय का कोणी? कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मेल्याचं एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu slams central govt for imposing export duty on onions asc