राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली असताना मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ओबीसींकडून या आरक्षणाला तीव्र विरोध केला जात आहे. खुद्द सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही अशा प्रकारे मराठा आरक्षण देण्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
मराठा समाजाला कुणबी म्हणून १०० टक्के आरक्षण मिळेल, असं बच्चू कडू म्हणाले. “दोन्ही पद्धतीने आरक्षण मिळायला सोपं जाईल. सर्वोच्च न्यायालयात सरकार ताकदीनं बाजू मांडेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, ते कुणबी आहेत हे १०० टक्के सत्य आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“छगन भुजबळांनी सांगावं की…”
दरम्यान, छगन भुजबळांकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडल्याबाबत विचारणा केली असता बच्चू कडूंनी भुजबळांनाच प्रतिप्रश्न केला. “भुजबळांनी आम्हाला सांगावं की मराठा कुणबी नाही तर कोण आहे? मराठा हा कुणबीच आहे. पण काही लोक मतदानाच्या पेटीचा हिशेब करून हे मुद्दे पुढे करून राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहेत. ते चुकीचं आहे. आता त्यावर कोर्ट निर्णय घेईल. कुणबी नोंद असेल, तर देशातल्या कुणालाही आरक्षण अडवता येणार नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास बच्चू कडूंनी टीव्ही ९ शी बोलताना व्यक्त केला.
“अभ्यास असून भुजबळांनी असं बोलावं याचं आश्चर्य”
मराठवाड्यात कुणबींच्या ५ हजार नोंदी होत्या, त्या वाढल्या कशा? असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केल्याबाबत विचारलं असता त्यावरूनही बच्चू कडूंनी टीका केली. “नोंदी आहेतच. सरकार सगळ्या जुन्या नोंदी काढत आहेत. त्या नोंदी काही पाकिस्तान, अमेरिकेतून आणल्या आहेत का? भुजबळ हे अभ्यासू नेते आहेत. त्यांनी तपासलं पाहिजे. महात्मा फुलेंनीही सांगितलंय की कुणबी, माळी, धनगर हे सख्खे भाऊ आहेत. त्यांना वेगळे करू नका. त्याहीपुढे जाऊन ते म्हणाले महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीतील लोक सगळे मराठा आहेत. मराठा हा समूहवाचक शब्द आहे. तो एका जातीचा नाही. त्यामुळे भुजबळांनी अभ्यास असूनही असं बोलावं याचंच नवल वाटतं मला”, असं बच्चू कडू म्हणाले.
“२४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
“मी कुणबी आहे. माझी जुनी नोंद कुणबी सापडली. मी मराठ्याचा कुणबी झालोच. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भातले मराठ्याचे कुणबी झाले. आता मराठवाड्यातले ५-६ जिल्ह्यातले मराठे कुणबी नाहीत हे म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मराठे हे कुणबीच आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे”, असंही ते म्हणाले.