गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरतो आहे. पैसे घेऊन बच्चू कडूंनी सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडूंनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, एक तारखेचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनीच भूमिका स्पष्ट करावी, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे हा वाज अजून पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज टीव्ही ९ शी बोलताना बच्चू कडू यांनी रवी राणांच्या आरोपांवरून सूचक इशारा दिला आहे.
“सगळेच अडचणीत येतील”
बच्चू कडूंनी यावेळी बोलताना रवी राणांच्या आरोपांमुळे सगळेच अडचणीत येतील, असा दावा केला आहे. “आरोप माझ्या एकट्यावर नाहीयेत. रवी राणा म्हणाले की बच्चू कडूंनी खोके घेऊन पाठिंबा दिला. पण तो आरोप सर्वांवर आहे. मी पैसे घेतले, तर मग ते कुणी दिले? शिंदेंनी की फडणवीसांनी? हे सिद्ध करावं लागेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
“हे सरकार पैसे देऊन स्थापन केलं का?”
हे सगळे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जातील, असा दावा बच्चू कडूंनी केला आहे. “हे सरकार पैसे देऊन स्थापन केलं का? ५० आमदारांना पैसे देऊन बोलावलं होतं का? त्यामुळे हा वाद माझ्यापुरता मर्यादित नाही. तो सगळ्यांना अडचणीत आणणारा विषय आहे. मला काय पाकिस्तानमधल्या लोकांनी पैसे दिले नसतील ना? दिले असतील, तर यांनीच दिले असतील”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
बच्चू कडू, रवी राणांमध्ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्हा पडली ?
शिंदे-फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवणार!
दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं. नाहीतर मी त्यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवणार”, असं ते म्हणाले. “या आरोपांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. मला आनंदच होईल. मी त्या चौकशीला सामोरा जाण्यासाठी कधीही तयार आहे. चौकशी झाली तर दूध का दूध, पानी का पानी होईल. हा डाग कधीतरी पुसला गेला पाहिजे ना”, असं ते म्हणाले.
“वरिष्ठांनी यावर समोर यायला हवं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी यावर भूमिका मांडायला हवी. नाहीतर आम्ही आमचं काम करू. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वच धोक्यात येत असेल, तर या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात”, असंही ते म्हणाले.
“फुसका बार की बॉम्ब एक तारखेला कळेल”
दरम्यान, “बच्चू कडूंचा संताप म्हणजे फुसका बार आहे”, अशी टीका रवी राणांनी केल्यानंतर त्यावरूनही बच्चू कडूंनी सुनावलं आहे. “हा फुसका बार आहे की बॉम्ब आहे ते आपण एक तारखेला दाखवू ना. कसा कुणाच्या खाली बॉम्ब लावायचा हे बच्चू कडूला चांगलंच माहिती आहे. एक तारखेलाच त्याचा परिणाम दिसेल. सगळे फटाके एक तारखेला वाजतील”, असं बच्चू कडू म्हणाले.