मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आधी मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाची जोरदार चर्चा झाली. यातून ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यांच्या नाराजीचीही चर्चा झाली. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं. बच्चू कडू यांनी आधीपासूनच आपल्याला कोणत्या खात्याचं मंत्रीपद हवं, याबाबत सूतोवाच केले होते. मात्र, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचा समावेश न झाल्यामुळे त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत मिश्किल टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांची देखील भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पटेल आणि बच्चू कडू यांच्याविषयी मिश्किल भाष्य केलं. “ये मीठा है और वो कडू है”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

“त्यांच्या नावात कडू का आहे हे…”

दरम्यान, अब्दुल सत्तार यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांनी त्यावर टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाचा कोणताही वेगळा राजकीय अर्थ नाही. बच्चू कडूंच्या नावात कडू असं लिहिलं आहे. आमचे पटेल म्हणजे मीठा राजकुमार आहे. या दोघांमधला फरक मी सांगितला. महाराष्ट्रात बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांचं काम चांगलं आहे. पण त्यांच्या नावात कडू का आहे हे तेच सांगू शकतील”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

“भाजपानं पक्षबदलासाठी आर्थिक ऑफर दिली म्हणणाऱ्या आमदारांची लाय डिटेक्टर टेस्ट करा”

“कडूंबद्दल कुणीच मिश्किल बोलू शकत नाही, कारण..”

“बच्चू कडू नाराज राहात नाहीत. गोरगरीबांचा आवाज उठवणारा तो माणूस आहे. त्यांच्याबद्दल कुणी मिश्किल टिप्पणी करू शकत नाही, कारण तेच इतक्या लोकांची मिश्किल टिप्पणी करतात”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu statement abdul sattar amravati visit rajkumar patel pmw