अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील, असे राजकीय संकेत आहेत, असं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फुट पडेल आणि त्यातून आमची महाशक्ती तयार होईल, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. बच्चू कडू यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू म्हणाले, “पंकजा मुंडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी जागा नाही, असं विधान केलं आहे. पंकजा मुंडे जे बोलल्या ते खरंच आहे. विधानसभेत धनंजय मुंडे आहेत. पण अजित पवार महायुतीबरोबर राहिले, तर धनंजय मुंडे यांना महायुतीचं तिकीट मिळेलं. अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर धनंजय मुंडे यांची जागा खाली होईल”

हेही वाचा – Bacchu Kadu On BJP : “भाजपने मित्र बनून शिंदे गटाच्या गळ्याला सुरी लावली,” बच्‍चू कडू यांची टीका

“अजित पवार बाहेर पडतील असे राजकीय संकेत”

यावरूनच अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारलं असता, “एकंदरित चित्र बघता, असं वाटतं की अजित पवार हे बाहेर पडतील. असे राजकीय संकेत आहेत. ज्याप्रमाणे पत्रकारांचे सूत्र असतात, तसे आमचेही आहेत. खरं तर आगामी विधानसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फुट पडणार आहे आणि त्यातूनच आमची महाशक्ती तयार होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“तो निर्णय आमची सुकाणू समिती घेईल”

दरम्यान, अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील का? असं विचारलं असता, “अजित पवार आमच्याबरोबर येतील की नाही, हे आता सांगता येणार नाही, याबाबत आमची सुकाणू समिती निर्णय घेईल”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

हेही वाचा – Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

दिव्यांगांच्या आंदोलनाबाबत म्हणाले..

पुढे बोलताना, बच्चू कडू यांनी आज झालेल्या मुंबई दिव्यांग बांधवाच्या आंदोलनाबाबतही प्रतिक्रिया दिली. “दिव्यांग बाधवांच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांचे प्रश्न सोडवण्याचे तसेच त्यांना मिळणारे मानधन वेळेत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांवर खर्च व्हायला हवा, मात्र, तो होताना दिसत नाही. त्यामुळे आज केवळ मुंबईत आंदोलन झालं आहे. पण जर दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागले नाही, तर राज्यभरात आम्ही आंदोलन करून”, असा इशारा त्यांनी दिला.