अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथविधी घेऊन जवळपास दहा दिवस उलटले आहेत. १० दिवसानंतरही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून महायुतीच्या सरकारची गुंतागुंत वाढतच चालली आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या सरकारच्या भवितव्याबद्दल सूचक विधान केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकतं आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनाही सत्तेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
हेही वाचा- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात नुरा कुस्ती सुरू आहे”, नाना पटोलेंची राज्य सरकारवर जोरदार टीका
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकतं. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरू असतील. म्हणून हे सरकार जेवढं मजबूत करता येईल, तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील.”
हेही वाचा- “ते दादांचं वैयक्तिक मत, माझं नाही”, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं विधान चर्चेत
राज्यातील राजकीय हालचालींवर भाष्य करताना बच्चू कडू पुढे म्हणाले की, सध्या राज्यात खातेवाटप किंवा नवीन मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असेल. आता अशी माहिती कानावर येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलेला गटही सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसमध्येही काहीही होऊ शकतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत सामील झालीच आहे. आता काँग्रेसच बाकी आहे, त्यांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असतील, असं मला वाटतं. त्यानंतर व्यूहरचना कशी करायची, त्यासाठी नेते दिल्लीत गेले असणार, असंही बच्चू कडू म्हणाले.