गेल्या आठवड्यापासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर व राज्यभरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण व आमदार अपात्रता सुनावणीच्या निमित्ताने अधिवेशनात राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
“सरकारनं कधी याचा विचार केला आहे का?”
बच्चू कडूंनी वंचित घटकांच्या बाजूने भूमिका मांडताना सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी चालकांना कामगार दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली. “सगळ्या वाहनांच्या चालकांना कामगार दर्जा देणं गरजेचं आहे. गावागावांमधल्या भूमीहीन मजुरांसाठी योजना आखायला हव्यात. शेतकऱ्यांप्रमाणेच या भूमीहीन मजुरांसाठीही योजना करायला हव्यात. देशभरात ११ हजार शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तो मजूर आहे म्हणजे कामगार नाहीये का? तुम्ही यावर कधी विचार केला आहे का? आपण यावर विचार करणं फार गरजेचं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“तुम्ही फक्त बांधकाम कामगार आणि त्यातला भ्रष्टाचार यावर बोलताय. पण त्या बांधकाम कामगारांमध्ये किमान निम्मे सगळ्या पक्षांचे पदाधिकारीच आहेत. खरा कामगार तिथे राहिलाच नाहीये. सुतार समाज अतिशय कमी आहे. एखाद्या गावात दोन-तीन जण भेटतात. सुतार कामगारांसाठीही बांधकाम मंडळाच्या माध्यमातून चांगली व्यवस्था करता येईल का हे पाहावं लागेल. विश्वकर्मा वगैरे सगळं चॉकलेट आहे. खूप महामंडळं निघाले, पण निम्मे महामंडळं बंदच आहेत”, असंही कडू यावेळी म्हणाले.
बच्चू कडूंचा राज्य सरकारला परखड सवाल
“धनगर समाजात आपण १ लाख लोकांना घर देत आहोत. आपण त्यांना १ लाख ३६ हजारांचं घर देत आहोत. आज एक भिंत तरी १ लाख ३६ हजारांमध्ये येते का? तालिका अध्यक्ष, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात, तीसुद्धा २-३ लाखांची आहे. मला एक समजत नाही की सरकारचं डोकं ध्यानावर आहे की नाही? सरकारच्या डोक्यात भुसा भरलाय का? १ लाख ३६ हजारांत घर होतंय का? गुलाबराव(पाटील)? का बोलत नाही तुम्ही?” अशा शब्दांत बच्चू कडूंनी सरकारला जाब विचारला.
“१ लाख ३६ हजारांत कुणी घर बांधून देत असेल तर मी दाढी-मिशा काढून टाकेन. कुणी असेल तर सांगा मला. तुम्ही बोलत का नाही यावर? शहरांतल्या लोकांना अडीच लाखांचं घर दिलं जातं, पण गावातल्या लोकांना सव्वा लाखांचं घर दिलं जातं. शेतकरी, शेतमजुरांची मतं नको आहेत का तुम्हाला? किती वेळा त्यावर बोलायचं या सभागृहात? भिंती फुटतील, पण तुमच्या डोक्यात कधी येईल? सभासद बोलून बोलून थकले”, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गुलाबराव पाटलांनाही केला सवाल
दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडूंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही जाब विचारला. “गुलाबराव पाटील, तुमचा पाणीपुरवठा विभागही तसाच आहे. टेंभं लावायला पाहिजे टेंभं. शहरवाल्यांना ७५ लिटर पाणी देताय आणि ग्रामीण भागाला ५० लिटर पाणी देता. झोपडपट्टीवाल्यांना ४५ लिटर पाणी देताय. काय जातीवादी आहात तुम्ही. एवढा जातीवाद तर दीड-दोनशे वर्षं आधी नव्हता. तुम्ही ग्रामीणवाल्यांना फालतू समजताय. मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन गुलाबराव. विचारेन की गुलाबराव असूनही गाववाल्यांना ५०-५५ लिटर आणि शहरवाल्यांना सव्वाशे लिटर पाणी का मिळतं? आम्ही तुमच्या गावात येऊन बोलू मग”, असं थेट आव्हानच बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांना दिलं.