राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. स्वत: अजित पवार शिंदे सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणलं असावं, अशी चर्चाही काही प्रमाणात होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आधीपासूनच सहभागी असणारे आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. तसेच, आपल्याला जागा मिळण्याबाबतही सरकारला अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला आहे.
“शिंदे गटाच्या आमदारांची गोची”
राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची गोची झाल्याचं कडू म्हणाले आहेत. “शिवसेनेचे जे ४० आमदार फुटून शिंदे गटाकडे आले, त्यांचा एक नारा होता की राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला काम करू देत नाही. विचारांची सांगड बसत नाही. अशी काही कारणं सांगून ते बाहेर पडले. आता पुन्हा राष्ट्रवादी सोबत आली आहे. त्यामुळे त्या ४०-४५ आमदारांची मोठी गोची झाली आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
शिंदे-फडणवीसांना इशारा?
दरम्यान, आता महायुतीमध्ये जागावाटप कसं होणार? याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. खुद्द अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात ९० जागा लढवण्याची घोषणा केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गट, तसेच मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. “आमच्या वाट्याला जागा येवो वा न येवो, त्याचं आम्हाला फार काही नाहीये. आम्हाला जागा दिल्या तर ठीक आहे, नाही दिल्या तर त्या पद्धतीने आम्ही सामोरं जाऊ”, असं बच्चू कडू टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले.
“…यामुळे भाजपाच गोत्यात जाणार”; बच्चू कडूंचं थेट विधान, खदखद व्यक्त करत म्हणाले…
“आमच्या विस्ताराचा विषय चालू होता. पण मध्येच तिसरा विस्तार आला. हेच धोरण आहे. विस्तार लांबवायचा. म्हणजे तोपर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की मला मंत्रीपद मिळेल. पण ते फार काळ टिकत नसतं. कधीकधी जास्त ताणून ठेवलं, तर त्याच्या वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. सारंकाही आलबेल आहे असं नाहीये. पण नाराजीला आवर घालणं, त्यांना विश्वास देणं महत्त्वाचं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
बंड शरद पवारांनी घडवून आणलं?
“एकंदरीत आजच्या स्थितीत असं वाटतं की ते अजित पवारांनाच करायचं होतं. मला सुरुवातीला वाटत होतं की शरद पवारांनीच हे बंड घडवून आणलं असेल. मी मारल्यासारखं करेन, तू मार खाल्ल्यासारखं कर वगैरे. पण तसं काही चित्र नाहीये”, असं ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर महायुती होणं अशक्य – कडू
“ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. पण त्या पातळीवर ही युती होणं कठीण आहे. तीन-चार पक्ष सांभाळणं, ते सोबत घेऊन जाणं सोपं नाहीये. कठीण आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादीची युती स्थानिक पातळीवर होईल असं वाटत नाही”, असंही बच्चू कडू म्हणाले.