गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. अमरावतीमधील विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या अधिकृत प्रवेशाआधीच भाजपानं त्यांना पक्षातून उमेदवारी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुतीचा भाग असणारे आणि नवनीत राणा यांचे कडवे विरोधक आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असतानाच बच्चू कडूंनी इथल्या राजकीय समीकरणांवर सूचक भाष्य केलं आहे.
नेमकं काय असेल अमरावतीतील राजकीय चित्र?
नवनीत राणा यांचा भाजपा प्रवेश व त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवर सातत्याने बोट ठेवणारे बच्चू कडू अद्याप महायुतीमध्येच कायम आहेत. मात्र, आता नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे त्यांनी लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यंदा भाजपामधून निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी असणाऱ्या व शेतकरी वर्गात व्यापक जनसमर्थन असणाऱ्या बच्चू कडूंनी मात्र विरोधाचा झेंडा फडकवला आहे.
दोघांचं टार्गेट एकच?
बच्चू कडूंनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी सूचक भाष्य केलं. यावेळी त्यांनी अभिजित अडसूळ यांचाही उल्लेख केला. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळही नाराज असून तेही याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अडसूळ व कडू एकत्र येणार का? यावर तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. त्यात बच्चू कडूंनी केलेलं विधान या चर्चांना खतपाणी देणारं ठरलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करू, असं सांगताना बच्चू कडूंनी अभिजीत अडसूळ व आपलं टार्गेट एकच असल्याचं विधान केलं आहे. “अभिजीत अडसूळ व आमचं टार्गेट एकच आहे. लोकशाहीचं पतन करणारा उमेदवार आमचं टार्गेट आहे. बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा. त्यासाठी ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
बच्चू कडू आक्रमक! “नवनीत राणांना पाडणार, स्वाभिमानाचा गुलाल उधळणार, भाजपाने…”
“शुक्रवारी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद होईल. कुणाला सोबत घ्यायचं ते आम्ही ठरवू. एकतर पाठिंबा द्यायचा की उमेदवार जाहीर करायचा हे तेव्हा ठरेल”, असं ते म्हणाले.
वर्ध्यातून निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी – कडू
दरम्यान, आपण वर्ध्यातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं बच्चू कडू म्हणाले. “२००-३०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे की मी वर्धा लढावं. किमान केंद्राच्या आयात-निर्यात धोरणाविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे. या कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. इतर ठिकाणी बिअर बारमध्ये जाऊन मागण्या केल्या जातात. ही पहिलीच वेळ आहे की कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मागणी केली आहे”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.