प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडू यांच्या विधानांमुळे अनेकदा त्यांच्या मित्रपक्षांचीही पंचाईत झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे बच्चू कडूंची राजकीय टोलेबाजी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण आता बच्चू कडू थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात ३० ऑगस्टपर्यंतची मुदत सचिन तेंडुलकरला दिली होती, असंही बच्चू कडूंचं म्हणणं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. पण आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरलाच ते नोटीस पाठवणार असल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असताना त्याला नोटीस पाठवण्यामागे नेमकी कोणती बाब कारणीभूत ठरली? यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं झालं काय?

गेल्या काही दिवसांपासून वाहिन्यांवर चालणाऱ्या काही विशिष्ट उत्पादनांच्या जाहिरातींवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यामध्ये पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंग अशा अनेक गोष्टींच्या जाहिरातींचा समावेश आहे. या जाहिराती चित्रपटसृष्टी व क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर करताना दिसत आहेत. त्यावरून अनेक वादही निर्माण झाले. खुद्द सचिन तेंडुलकरनं आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. मात्र, तरीही त्यानं केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत.

“सचिन तेंडुलकरनं भारतरत्न परत करावा, ३०० कोटी घेऊन…”, ‘त्या’ प्रकारावरून बच्चू कडू आक्रमक!

काय आहे बच्चू कडूंची भूमिका?

बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना यावर खुलासा केला आहे. “आम्ही ३० तारखेला सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहोत. त्यांना आम्ही ३० तारखेपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी यासंदर्भात त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार आहोत”, असं बच्चू कडू म्हणाले.

“भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू”, असं बच्चू कडूंनी नमूद केलं. तसेच, “३० तारखेला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करू”, असं सांगतानाच सचिन तेंडुलकरविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले.