अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर ‘राणा विरुद्ध कडू’ असा संघर्ष निर्माण झाला. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणांकडून वादावर पडदा टाकण्यात आला आहे. त्यांनी आपले आरोप मागे घेतले आहेत.
पण बच्चू कडू यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अमरावतीत १ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण भूमिका स्पष्ट करणार आहे, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी ‘मैं झुकेगा नही’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पाहा व्हिडीओ –
रवी राणांनी आरोप मागे घेतल्यानंतर तुमच्यातील वाद संपला का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “नाही, अजून वाद संपला नाही. आमच्या संस्थापक सदस्यांशी मी उद्या चर्चा करणार आहे. आम्ही सर्व मुद्दे लिहून घेतले आहेत. उद्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून ते जिल्हा प्रमुखांसमोर मांडणार आहोत. त्यानंतर पुढे काय करायचं? हा निर्णय घेतला जाईल. सध्या तीन भूमिका समोर येत आहे. त्यामध्ये तटस्थ राहायचं, सत्तेत राहायचं की बाहेर पडून पाठिंबा द्यायचा, अशा तीन भूमिका समोर येत आहेत. चर्चेअंती जास्त गणित ज्या भूमिकेवर जुळून येईल, त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल” असं बच्चू कडू म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.