गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठकही चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, त्याचवेळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवण्याची केलेली घोषणाही सध्या चर्चेत आहे. बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून आता त्यांनी थेट सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराच दिला आहे.
नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करण्यावर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला होता. “भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू”, असं बच्चू कडू म्हणाले होते. आता त्यांनी सचिननं भारतरत्न परत करण्याची भूमिका मांडली आहे.
“सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यांच्याविरोधात आम्ही एक मोठं आंदोलन करू. एक भारतरत्न व्यक्ती ऑनलाईन गेमिंगची जाहिरात कशी करू शकते?” असं बच्चू कडू म्हणाले.
“सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आदर, पण…”
दरम्यान, सचिन तेंडुलकर ३०० कोटी घेऊन जाहिराती करत असल्याचं बच्चू कडू म्हणाले. “सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांना भारतरत्न मिळाला आहे. त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणं हे अत्यंत वाईट आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा जुगारासारख्या वाईट गोष्टीची जाहिरात करत असेल आणि त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत असेल, घरं बरबाद होत असतील, तर ते अयोग्य आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार; नेमकं झालं काय?
“जर सचिन तेंडुलकर यांना ३०० कोटी रुपये घेऊन जाहिरातच करायची असेल, तर त्यांनी भारतरत्न परत करावं. ते जर केलं नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर मोठं आंदोलन करू. आंदोलनाची तारीख आम्ही उद्या जाहीर करू”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.