मागील अनेक दिवसांपासून अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटलेला होता. अखेर त्यांच्या या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली.. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता या दोघांमधील वाद मिटणार की आणखी चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज सकाळी आमदार रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांसमोर बच्चू कडूंवर ५० खोक्यांच्या केलेल्या आरोपाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र अद्याप बच्चू कडू यांनी या दिलगिरीवर नेमकी काय भूमिका घेणार हे जाहीर केलेले नाही.
आमदार रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्यानंतर आज बच्चू कडू हेही प्रसारमाध्यमांसमोर आले यावेळी त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल माहिती देताना सांगितले की, “या सगळ्यावर कार्यकर्त्यांच्या भूमिका फार महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी कार्यकर्ता आणि जनता फार महत्त्वाची आहे. आज संध्याकाळी आम्ही बैठक घेणार आहोत. या बैठकीनंतर कशा पद्धतीने सामोरं जायचं?, काय करायचं? उद्या आमचा दुपारी १२ वाजता जाहीर मेळावा आहे. जिथे आम्ही पुरावा मागण्यासाठी बसणार होतो. उद्या राज्यभरातील सर्व कार्यकर्ते येणार आहेत आणि तिथे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.”
याशिवाय “या सगळ्याबद्दल खरंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचेही आभार आहेत. परंतु कार्यकर्त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझा आत्माच कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाही. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे आणि उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” असंही बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं.