बच्चू कडू यांनी आज विधानसभेत बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज सरकारवर जोरदार टीका केली. दादा भुसे यांच्या चालकाला २५ ते ३० हजार पगार मिळतो, तर जो जनतेची सेवा करतो, त्या एसटी चालकाला फक्त १२ हजार रुपये पगार दिला जातो. सरकारला याची लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे. दरम्यान, बच्चू कडूंच्या या टीकेला मंत्री दादा भुसे यांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी बच्चू कडू आणि दादा भुसे यांच्या चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “फक्त समृद्धीवरच अपघात होत नाहीत, खेडेगावातील रस्त्यांवरही…”; ‘शक्तीपीठ’वर बोलताना दादा भुसेंचं वक्तव्य चर्चेत!

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

दादा भुसे यांनी सत्य सांगावं, तुमच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटीच्या चालकाला का मिळत नाही. दादा भुसे यांच्या गाडीचा चालक एसीच्या गाडीतून फिरतो. मात्र, एसटीचा चालक भर उन्हात एसटी चालवतो. जनतेची सेवा करतो. पण त्याला पगार दादा भुसे यांच्या चालकापेक्षा कमी आहे. हे सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.

कायद्यानुसार, किमान १४ हजाराच्यावर पगार दिला जाणं बंधनकारक आहे. मात्र, शासनच कायदा मोडत असेल, तर आपण कुणाच्या थोबाडीत मारावी? दादा भुसे यांना याचा राग का येत नाही? याबाबतचं सत्य-असत्य काय ते दादा भुसे यांनी सांगावं. सरकारला याची थोडी लाज वाटली पाहिजे, एका चालकाला २५ ते ३० हजार पगार मिळतो, तर जो जनतेची सेवा करतो, त्याला फक्त १२ हजार रुपये पगार दिला जातो. लाज वाटत नाही का? सरकार याचं उत्तर का देत नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक

दादा भुसेंचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर

दरम्यान, बच्चू कडू यांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांनीही प्रत्युत्तर दिले. मी बच्चू कडू यांचा आदर करतो. मी सुद्धा त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो, असं ते म्हणाले. तसेच सध्या एसटीच्या चालक आणि वाहकाला सरासरी ३८ हजार पगार दिला जातो, अशी माहिती त्यांनी सभागृता दिली. पुढे बोलताना मागच्या सरकारचा कार्यकाळ बघितला, तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे, मात्र, त्यांना लाज वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachhu kadu criticized state government st driver salary dada bhuse replied in vidhansabha spb
First published on: 02-07-2024 at 13:30 IST