विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला पहिला विजय मिळाला असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. तर भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूरात मात्र भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवाय, औरंगाबादेमध्येही भाजपाच्या पदरी पराभवच आल्याचे दिसत आहे. या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरांनी भाजपाला टोला लगावला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजपा निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेटवर घेण्याचे औदार्य दाखवावे.” असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
यावर, “मला तर वाटलं बॅलेटवर जरी घेतलं तर अधिकच चांगलं आहे. असं झालं तर लोकांच्या डोक्यातून संभ्रम तरी निघेन. माझं म्हणणं आहे, संभ्रमात राहणं चांगलं नाही.” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
त्यांनी भाजपाचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “नागपूरकर ‘गाणार’… आज ‘कमळाबाई’ जाणार… बावन’कुळां’चा उद्धार… काही दिवसांत होणार… संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी… नितीनजी ठरतील का भावी “गड”करी?”