एकनाथ शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड केलं होतं. तेव्हा शिवसेनेच्या ४० आमदारांसह काही अपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यात बच्चू कडू हेही होते. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर बच्चू कडू यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे ते नाराजं असल्याचं बोललं जात होतं.

त्यात आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचं रवी राणांनी म्हटलं आहे. रवी राणांच्या आरोपांवरून बच्चू कडू यांनी संतप्त होत, १२ आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावर आता दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार? रामदास कदमांचं मोठं विधान, म्हणाले…

“बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “खोक्याशिवाय यांचं पान…”, आदित्य ठाकरेंवर रवी राणांचे गंभीर आरोप; म्हणाले…

दरम्यान, रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. रवी राणांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा. तसेच, रवी राणांनी माझ्यावरील भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीतर, न्यायालयात जावू, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे.