अहिल्यानगरः जिल्ह्यात पशुधनाची वाढती संख्या, जिल्हा दुग्धोत्पादनात राज्यात अग्रेसर आहे, मात्र असे असताना जिल्ह्यात १७६ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा अनुशेष आहे. त्याला पर्याय म्हणून राज्य सरकारने १४ मोबाइल दवाखाने सुरू केले. मात्र, वाढलेल्या पशुधनाच्या तुलनेत अधिक दवाखान्यांची गरज भासते आहे.पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या १३ लाख ७८ हजार ३०३ आहे. म्हशींची संख्या २ लाख ३१ हजार ३५५, मेंढ्यांची संख्या २ लाख ८५ हजार ५७५, शेळ्यांची संख्या ११ लाख ९४ हजार, डुकरांची संख्या ५४६४, तर कुक्कुटपालन व्यावसायिकांकडे ८९ लाख कोंबड्या आहेत. दुग्धोत्पादन करणाऱ्या गाईंची संख्या ५ लाख ६३ हजार, तर ३ वर्षांवरील गाईंची संख्या ९ लाख ३४ हजार आहे.

याशिवाय जिल्हा दुग्धोत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी सुमारे ४४ लाख लिटर दूधसंकलन होते. शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या संख्येने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेले आहेत.पशुसंवर्धन विभागाच्या निकषानुसार डोंगरी भागासाठी ५ हजार घटकांमागे (एक गाय, एक बैल, एक वासरू, १० शेळ्या, १०० कोंबड्या, ५ डुकरे यांचा एक घटक) एक पशुवैद्यकीय दवाखाना हवा, तर बिगरडोंगरी भागासाठी हा निकष ३ हजार घटक पशुधनाचा आहे.

जिल्ह्यात सध्या २२३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. वाढलेल्या पशुधनासाठी आणखी अतिरिक्त १७६ दवाखान्यांची आवश्यकता असल्याचे प्रस्ताव वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठवले गेले. त्यांतील काही दवाखाने सन २०११ पासून गरोचे म्हणून पाठवलेले आहेत.अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त दवाखाने निर्माण करण्यासाठी पदनिर्मितीची गरज भासते आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने १४ मोबाइल दवाखाने दोन वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिले. प्रत्येक तालुक्यासाठी एक मोबाइल दवाखाना देण्यात आला. मात्र, सुरुवातीचे सहा महिने हे मोबाइल दवाखाने चालकाभावी एका जागेवरच उभे होते. चालक उपलब्ध झाल्यानंतर त्यांची सेवा सुरू झाली. मात्र, ती पुरेशी ठरत नाही. त्यामुळे जनावरांच्या लसीकरण मोहिमेत अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.