बांबू विक्रीसंदर्भातील पारदर्शी व्यवहाराने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गडचिरोलीतील लेखामेंढा व एरंडी या गावांनी यंदा बांबू विक्रीसाठी चक्क ई निविदा काढली आहे. वनउत्पादन विक्रीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर करणारी ही देशातील पहिलीच गावे आहेत. वनहक्ककायद्यांतर्गत गावासभोवतालच्या जंगलावर सामूहिक हक्कमिळवणाऱ्या लेखामेंढा या गावाने कायद्यात नमूद असलेला गौण वनउत्पादन विक्रीचा हक्कमिळावा म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. तेव्हाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी या आंदोलनाची दखल घेत या गावात स्वत: येऊन बांबूच्या तोडणी व विक्रीचे अधिकार या गावाला बहाल केले होते. तेव्हापासून या विक्रीच्या माध्यमातून लाखोचा नफा मिळवणाऱ्या व त्यातून गावाच्या विकासाची कामे करणाऱ्या लेखामेंढा ग्रामसभेने आता या वर्षी एक पाऊल पुढे टाकले आहे. १० लाखांपेक्षा जास्त किमतीची कोणतीही निविदा ऑनलाइन पद्धतीनेच प्रकाशित करावी, असा नियम राज्य शासनाने केला आहे. या ग्रामसभेने यंदा या नियमाचे पालन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लेखामेंढा ग्रामसभेने यंदा बांबू विक्रीसाठी ई निविदा प्रकाशित करण्यासाठी सर्वात आधी वनखात्याशी संपर्क साधला. या खात्याने फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर ग्रामसभेने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना मदत करण्याविषयी विनंती केली. कृष्णा यांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी या तसेच कुरखेडा तालुक्यातील एरंडी ग्रामसभेच्या निविदा राज्य शासनाच्या संगणकीय प्रणालीवर झळकल्या आहेत.
या प्रणालीवर ग्रामसभांची निविदा प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लेखामेंढा गावाने यंदा बांबूच्या दोन लाख नगांची विक्री करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी व्यापाऱ्यांकडून दर मागविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी लेखामेंढा गावाने ३३ रुपये प्रति नग या किमतीने बांबूची विक्री केली होती. गेल्या वर्षी या गावाने बांबू विक्रीतून ९४ लाख रुपये मिळवले. गावकऱ्यांची मजुरी दिल्यानंतर या ग्रामसभेला ४५ लाखांचा नफा झाला. त्याच्या आधीच्या वर्षी या गावाने २२ लाखांचा बांबू विकला व त्यातून १० लाख रुपयांचा नफा मिळवला होता. या दोन्ही गावांची ई निविदा येत्या २० मेला उघडण्यात येणार असून, त्यानंतर व्यापाऱ्यांचे दर बघून ग्रामसभा निविदेसंदर्भातील अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती देवाजी तोफा यांनी दिली.
जंगलावर सामूहिक मालकी मिळवणाऱ्या अनेक गावांनी आता बांबू व तेंदूपानांची विक्री सुरू केली असली तरी त्यासाठी ई निविदेचा वापर करणारी ही पहिलीच गावे ठरली आहेत.
बांबू विक्रीसाठी गडचिरोलीतील दोन मागास गावांची ‘ई निविदा’
बांबू विक्रीसंदर्भातील पारदर्शी व्यवहाराने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गडचिरोलीतील लेखामेंढा व एरंडी या गावांनी यंदा बांबू विक्रीसाठी चक्क ई निविदा काढली आहे. वनउत्पादन विक्रीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर करणारी ही देशातील पहिलीच गावे आहेत. वनहक्ककायद्यांतर्गत गावासभोवतालच्या जंगलावर सामूहिक हक्कमिळवणाऱ्या लेखामेंढा या गावाने कायद्यात नमूद असलेला गौण वनउत्पादन विक्रीचा हक्कमिळावा म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठे आंदोलन केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backward villages of gadchiroli fill e tender of tendu for sale