हैदराबादेत काल झालेल्या बॉम्बस्फोटाने संगमनेरकरांच्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. बरोबर साडेपाच वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये अशाच स्वरूपाच्या बॉम्बस्फोटात संगमनेरमधील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. आजही त्या दिवसाची आठवण झाली की अंगावर शहारे येतात आणि मन सुन्न होते, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया येथे उमटली. याशिवाय जीवनमरणाचा हा खेळ थांबणार तरी कधी असा उद्विग्न सवाल उपस्थित केला गेला.
हैदराबादेतील कालच्या स्फोटाची माहिती कळताच संगमनेरकरांच्या गतस्मृती ताज्या झाल्या. २५ ऑगस्ट २००७ या दिवशी ती भयावह दुर्घटना घडली होती. त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत घडलेला संपूर्ण घटनाक्रम संगमनेरकरांच्या डोळ्यापुढे जसाच्या तसा उभा राहिला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या परिवारात तर आज याच एकमेव घटनेची चर्चा होती. संस्थेचे प्रबंधक संपतराव बोरकर हेही अस्वस्थ होते. अनेकांच्या मनात त्या नकोशा स्मृतींनी काहूर केले होते. त्या आठवणींनी नकळत काहींचे डोळेही पाणावले.  आभियांत्रिकी महाविद्यालयाची सहल हैदराबादला गेली होती. दोन दिवस आनंदात घालविल्यानंतर २५ ऑगस्ट २००७ला विद्यार्थी हैदराबादेत पोहोचले. लुंबिनी पार्कमध्ये सायंकाळी साडेसातचा लेझर शो पाहण्यासाठी सर्वजण जमलेले होते. शो दरम्यानची आश्चर्यकारक कलाकृती एकमेकांशी शेअर करत असतानाच अचानक धमाका झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. काय झाले कोणालाच समजत नव्हते. जो तो जीव वाचविण्यासाठी पळत होता. तासाभरानंतर घटनेचे गांभीर्य सर्वाच्या लक्षात आले, मदतकार्य सुरू झाले. स्फोटातून वाचलेल्यांनी आपल्या ग्रुपमधील कोण कोण नाही याची खातरजमा करण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थी गायब असल्याचे लक्षात आले मात्र त्यांचा थांगपत्ता लागेना.  आणि अखेर ती अप्रिय घटना समोर आली. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आपल्या सोबतचे सात सवंगडी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वावर आभाळ कोसळले. इर्षांद अब्दल गनीअहमद (मुंबई), मिलिंद किसन मांडगे (पारनेर), किरण अरुण चौधरी (ठाणे), सुरजकुमार (पुणे), सुजित झा (बिहार), रुपेश गणपत भोर (पुणे) आणि सचिन भवर (जोर्वे, संगमनेर) अशी त्या सात दुर्दैवी मुलांची नावे होती. हे सातजण आता आपल्यात नाहीत या कल्पनेनेच उर्वरित विद्यार्थी हादरले. याशिवाय सातही जणांच्या घरचे वातावरण सुन्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामार्फत लगेच आंध्र प्रदेश सरकारशी संपर्क करून सर्व विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. थोरात यांच्यासह अमृतवाहिनीच्या अधिकाऱ्यांनी लगोलग हैदराबाद गाठले. सर्व मृतदेह नातेवाईकांकडे पाठविण्यात आले. सचिन भवर याच्या पार्थिवावर जोर्वे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी संपूर्ण तालुका लोटला होता.
उर्वरित विद्यार्थ्यांना घेऊन तिसऱ्या दिवशी बस संगमनेरला आली. प्रचंड तणावात असलेले ते विद्यार्थी संगमनेरच्या भूमीत पाय ठेवताच ओक्साबोक्सी रडत होते. या वेळी देखील एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली होती. अशा एक ना, अनेक आठवणी आज नकळतपणे सर्वाच्या डोळ्यासमोर तरळल्या. स्फोटात गेलेल्यांना त्या वेळी आंध्र सरकारने पाच लाख, महाराष्ट्र सरकारने दोन लाख तर पुणे विद्यापीठाने ५० हजारांची मदत दिली. मात्र असे कितीही लाख मिळाले तरी गेलेली मुले आणि त्यांच्या डोळ्यांतून पाहिलेले उज्ज्वल भविष्य पुन्हा परत येणार नाही, याची खंत आजही सर्वाना सलते आहे.

Story img Loader