मुंबई /ठाणे /अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांची शनिवारी दादर, पनवेल, दिवा रेल्वे स्थानकांवर गर्दी उसळली होती, तर ठाणे-बेलापूर, मुंबई-गोवा आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागून अभूतपूर्व कोंडी झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि उशिरा सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ांमुळे यंदाही गणेशभक्तांचे प्रवासहाल होत असल्याचे चित्र आहे.
कोकणवासीयांना अनेक ठिकाणी प्रवासविघ्नाला तोंड द्यावे लागले. महामुंबईच्या वेगवेगळय़ा मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. ठाण्यातील घोडबंदर मार्ग, मुलुंड टोल नाका, ऐरोली टोल नाका, ठाणे बेलापूर मार्ग, कल्याण-शिळ रस्त्यावर शनिवार दुपारपासूनच वाहनाच्या भल्याथोरल्या रांगा लागल्या. एकीकडे रस्त्यांवर वाहनकोंडी, तर दुसरीकडे कोकण रेल्वेचे महत्त्वाचे थांबे असलेल्या दिवा, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असे चित्र होते. काही रेल्वे गाडय़ा उशिराने धावत असल्याने खोळंबलेले प्रवासी आणि स्थानकांवर नव्याने येणारे प्रवासी यांची झुंबड उडाली होती.
ठाण्यातील आनंदनगर आणि नवी मुंबईतील ऐरोली टोल नाक्यावरून शनिवारी दिवसभरात सुमारे ७०० ते ८०० वाहने कोकणाकडे रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ठाणे आणि घोडबंदर भागातून रात्री आणि दुपारी अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचा भार वाढून कोंडी वाढली. गणेशभक्तांच्या प्रवासात केवळ मुंबई परिसरातच विघ्न होते, असे नाही तर पनवेलच्या पुढेही मुंबई- गोवा महामार्गावर खड्डे आणि महामार्गाचे अर्थवट कामाचे विघ्न होते. वाहनांची वर्दळ इतकी होती की खारपाडा टोल नाका येथून सकाळच्या सत्रात तासाला १२०० गाडय़ा मार्गस्थ होत होत्या. म्हणजेच दर मिनिटाला जवळपास २० गाडय़ा कोकणच्या दिशेने रवाना होत होत्या.
मुंबई पुणे दृतगती मार्गावरही सकाळी खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पनवेलच्या पळस्पे फाटय़ाजवळ सात ते आठ किलोमीटर, तर वडखळ नाक्यावर पाच ते सहा किलोमीटपर्यंत वाहनरांगा होत्या. दुपारी माणगाव परिसरात चार ते पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. हे आंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागत होता. सकाळच्या सत्रात पेण, नागोठणे, कोलाड, इंदापूर, लोणेरे आणि वडपाले परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. काही ठिकाणी गणेशभक्तांना एक ते दोन तास वाहनात ताटकळावे लागले.
टोलवसुली सुरूच
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य शासनाने शनिवारपासून पथकर माफ केला असला तरी मुंबई – गोवा आणि मुंबई -बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे मोफत प्रवेशिका असतानाही फास्टटॅगमधून पैसे आपोआपच वळते होत आहेत. या गोंधळामुळे अनेक पथकर नाक्यावर गणेश भक्त आणि नाका कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याचे चित्र आहे. गणेशभक्तांना ५६० रुपयांपर्यंत पथकर द्यावा लागत आहे. परतीचा प्रवासामुळे हा भरुदड दुप्पट होतो.
सुरळीत प्रवासासाठी..
महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतूक नियमानासाठी ४०० पोलीस आणि ३५ पोलीस अधिकारी बंदोबस्तावर आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४० मोटरसायकल पथके कार्यरत आहेत. महामार्गावर १० ठिकाणी प्रवासी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत.
रेल्वे सात तास विलंबाने..
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी विशेष रेल्वे शुक्रवारी मध्यरात्री सुटू शुक्रवारी दुपारी पोहोचणार होती. मात्र ती पनवेल स्थानकात शनिवारी सकाळी ८.१५ वाजता आली. प्रवाशांना सात तास ताटकळावे लागले. गाडीच्या विलंबाचे कारण न जाहीर न केल्याने प्रवासी संतापले होते.
अवजड वाहने रस्त्यावरच..
- गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहने मोठय़ा प्रमाणावर धावत असल्याचे चित्र माणगाव परिसरात होते. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती.
- ठाणे आणि घोडबंदर भागातूनही शुक्रवारी रात्री आणि दुपारी अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी प्रचंड वाढली.