वादळी वारे आणि पावसामुळे मासेमारी हंगाम लांबला. १ ऑगस्टपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारीवरील बंदी उठवण्यात आली असली तरी खराब हवामानामुळे मच्छीमांरानी बोटी खोल समुद्रात सोडलेल्या नाहीत.

रायगड जिल्ह्य़ाला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यात प्रामुख्याने उरण, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात ४ हजार ५०० यांत्रिकी आणि बिगरयांत्रिकी नौका असून ४८ हजार ७११ मच्छीमार या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. चार तालुक्यांतील ४८ मासेमारी केंद्रांवर प्रामुख्याने मासेमारी केली जाते. यातून दरवर्षी जवळपास ४२ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जाते.

पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ मानला जातो. त्यामुळे मासे किनाऱ्यावर येत असतात. सागरी जिवांचे संवर्धन व्हावे आणि निसर्गाचा समतोल राखला जावा म्हणून शासनाकडून पावसाळ्यात मासेमारी करण्याला बंदी घालण्यात येत असते. पावसाळ्यात समुद्राला मोठमोठी उधाणे येत असतात. त्यामुळे मासेमारी नौका आणि मच्छीमार यांच्या जिवाला धोका संभवू शकतो. त्यामुळेही मासेमारी करण्यावर र्निबध घातले जातात. शासनाच्या धोरणानुसार १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत किनारपट्टीवर मासेमारी करता येत नाही. त्यामुळे या दोन महिन्यांच्या कालावधीत मच्छीमार बोटींची दुरुस्ती करणे, मासेमारी जाळ्यांची देखभाल करणे यांसारखी कामे करीत असतात. बोटींची रंगरंगोटी करून १ ऑगस्टनंतर आपल्या बोटी पुन्हा एकदा पाण्यात सोडत असतात.

या वर्षी मात्र खराब हवामानाचा मासेमारी व्यवसायाला फटका बसला आहे. वादळी वारे, मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे यामुळे समुद्र अद्यापही शांत झालेला नाही. त्यामुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांनी आपल्या बोटी खोल समुद्रात सोडल्या नाहीत. समुद्रातील पाण्याला प्रचंड वेग असल्याने मासेमारीसाठी टाकण्यात येणारी जाळी गुरफटून नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच बोटी उलटण्याची भीती आहे. त्यामुळे अजून किमान एक आठवडा समुद्र शांत होण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बले यांनी सांगितले.

Story img Loader