Maharashtra Bandh : महाविकास आघाडीची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बदलापूरमधील घटनेबाबत, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर बदलापूरच्या घटनेच्या निषेर्धात २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली. या संदर्भातील माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

संजय राऊत काय म्हणाले?

“महाविकास आघाडीची आज एक बैठक पार पडली. आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र आलो होतो. मात्र, जागावाटपावर चर्चा न करता बदलापूरची घटना आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर चर्चा केली. बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एक रोष निर्माण झाला आहे. त्या घटनेनंतर ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्या विरोधात आता गुन्हे दाखल केले जात आहेत. आता आम्ही आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे की, बदलापूरच्या घटनेबाबत २४ ऑगस्ट रोजी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बदलापूरमध्ये काय घटना घडली?

बदलापुरातील एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी लवकर गुन्हा दाखल करुन घेतला नाही, असा आरोप आता केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी संबधित शाळेच्या समोर पालकांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या देत तब्बल ९ तास बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर पोलिसांनी सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ तास रेल्वे मार्ग ठप्प होता. पोलिसांनी अखेर आंदोलकांवर लाठी चार्ज करत रेल्वे मार्ग मोकळा केला. त्यानंतर आंदोलनामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा अखेर १० तासानंतर सुरळीत झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur crime case maharashtra bandh on 24th august on behalf of mahavikas aghadi gkt