Sanjay Raut on Akshay Shinde Fake Encounter: बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीला त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात नोंदवला. हा अहवाल सोमवारी उच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हटले की, अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला नसून त्याचा खून करण्यात आला, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला असून पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले. याला जबाबदार कोण? लैंगिक अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन व्हायला हवे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार-खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. पण त्याला फाशी देण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वरच्या न्यायालयात जाणार आहेत. बदलापूर प्रकरणातही असे करता आले असते. ताबडतोब फास्ट्र ट्रॅक न्यायालयात खटला चालवून संबंधित आरोपीला कठोर शिक्षा देणे सहज शक्य होते.

विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून आरोपीसा खोट्या चकमकीत मारले गेले. यामुळे आता पाच पोलिसांवर गुन्हा दाखल होत आहे. यावर आता तत्कालीन गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहीज. या पाच पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केले का? असे असेल तर त्यावेळच्या पोलीस आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहीजे. त्यावेळच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या परवानगीने ही चकमक झाली होती का? असे असेल तर तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहीजे, ही आमची मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

अक्षय शिंदेंसारखा न्याय इतरांना का नाही दिला

आरोपी अक्षय शिंदे याची हत्या झाली, याचे आम्हाला दुःख नाही. पण यामाध्यमातून लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाला. जर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना संपवायचे आहे, तर त्याच भागात विशाल गवळी नावाच्या नराधमाने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्याचा एन्काऊंटर का नाही केला? हेदेखील माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच झाले आहे. बीड जिल्ह्यात संतोष देशमुखची हत्या झाली. त्या आरोपींचेही एन्काऊंटर का नाही केले? अक्षय शिंदे सारखा न्याय या प्रकरणात का नाही दिला? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Story img Loader