Badlapur School Case Devendra Fadnavis Mahavikas Aghadi : बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जाग आली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी केलेली दिरंगाई, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूरच्या तपोवन मैदानात आज (गुरुवार, २२ ऑगस्ट) महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. यावेळी फडणवीस म्हणाले, आम्ही (महायुती) आता ठरवलं आहे की अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. गुन्हेगारांना फाशीपर्यंतची शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करू. त्यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत शांत बसायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महिलांवरील अत्याचार आणि अशा प्रकारची परिस्थिती आम्ही सहन करणार नाही.
राज्याचे गृहमंत्री म्हणाले, मला एक गोष्ट सांगायची आहे मुलगी कोणतीही असो ती आपलीच असते. कोलकात्यामध्ये एका डॉक्टर तरुणीवर भयानक अत्याचार झाले, अत्याचार करून तिचा खून करण्यात आला मात्र महाविकास आघाडीतील लोकांनी त्या प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाहीत. कोलकत्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतरही हे लोक ममता बॅनर्जी यांचं कौतुक करत राहिले. त्यांनी एका शब्दाने त्या घटनेचा निषेध नोंदवला नाही. महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारच्या मागण्या करू लागले आहेत.
तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी या लोकांना एवढंच सांगतो, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे, रडायचं नाही लढायचं. आम्ही पळून जाणारे नाही, आम्ही लढणारे आहोत. अशा प्रकरणांमधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. काहीही झालं तरी चालेल या नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. ही गोष्ट विरोधकांना ठणकावून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या. कारण ते संवेदनाहीन आहेत.