Badlapur Sexual Assault School Girls Case Raj Thackeray : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी या नराधमांचा चौरंग केला असता”. तसेच राज यांनी दावा केला आहे की बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण मनसेच्या महिला कार्यकर्त्यांमुळे सर्वांसमोर आलं.
राज ठाकरे म्हणाले, “बदलापूरमधील एका शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार झाला आहे. त्या घटनेनंतर १२ दिवस सर्वजण चिडीचूप होते. कोणी काहीही बोलायला तयार नव्हतं. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. मात्र आपल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उकरून बाहेर काढलं आणि आता ते लोकांसमोर आलं आहे. त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे प्रशासन व सरकार हादरून गेलं आहे. तिकडे कोलकात्यातही बलात्काराची भयंकर घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातही तेच घडतंय. या अशा बलात्काराच्या घटना पाहिल्या की मला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. आज आपले महाराज असते तर त्यांनी एकेकाचे चौरंग करून ठेवले असते”.
पोलिसांना ४८ तास फ्री हँड देईन : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष म्हणाले, “मला एक गोष्ट कळत नाही या नराधमांची एखाद्या महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कशी होते? त्यांची अशी हिंमत होते कारण त्यांना प्रशासनाची अथवा कायद्याची भीती राहिलेली नाही. या घटना पाहून मी पोलिसांना किंवा अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. कारण यांनी अशा घटनांप्रकरणी कारवाई केली की सरकार यांच्यावर कारवाई करतं. त्यामुळे पोलीस म्हणत असतील ‘आम्ही कशाला कारवाई करू’. अनेक ठिकाणी अनेक वेळा असं घडलं आहे. पोलिसांनी कारवाई केली की सरकार हात वर करतं आणि मग पोलीसच त्या प्रकरणांमध्ये अडकतात. माझं पोलिसांना सांगणं आहे, एकदा माझ्या हातात महाराष्ट्र देऊन बघा, एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मी ४८ तास तुम्हाला फ्री हँड (मोकळीक) देईन. त्या बदल्यात मला संपूर्ण महाराष्ट्र कोरा करकरीत करून पाहिजे”.
हे ही वाचा >> Badlapur Case : “ठाकरे सरकारच्या काळात…”, बदलापूर प्रकरणानंतर फडणवीसांचं मविआकडे बोट; म्हणाले, “तुम्ही संवेदनाहीन होऊन…
“…तर कोणाचीही आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची टाच होणार नाही”
राज ठाकरे म्हणाले, माझा महाराष्ट्र पोलिसांवर मुंबई पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. यांच्या हातात जर सगळं काही दिलं तर ते महाराष्ट्र कोरा करकरीत करू शकतात. मुळात कोण, कुठे, काय करतोय, कोणाचं कसं चाललंय, या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती असतात. परंतु, सरकार त्यांना पाठिंबा देत नाही. तरीदेखील त्यांनी कारवाई केलीच तर सरकारही त्यांचाच बळी घेतं आणि हेच आजवर होत आलं आहे. मात्र पोलिसांना पाठिंबा मिळाला तर कोणाचीही आपल्या आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.
© IE Online Media Services (P) Ltd